Save Dapchari | दापचारी प्रकल्पग्रस्तांची जमीन परत देण्याची मागणी

तलासरी - दापचारी दुग्ध प्रकल्पासाठी शासनाने जमीन संपादन केली. मात्र हा प्रकल्प बंद पडल्यामुळे जमीन पुन्हा परत द्यावी, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी ठाकरपाडा येथे झालेल्या बैठकीत केली. सभेसाठी एक हजाराच्या आसपास प्रकल्पग्रस्तांचे वारसदार उपस्थित होते. सभेच्या अध्यक्षस्थानी अशोक पऱ्हाड, आमदार राजाराम ओझरे होते. प्रमुख पाहुणे आमदार ऍड. चिंतामण वनगा, सामाजिक कार्यकर्ते जयवंत ओझरे उपस्थित होते.

एच. बी. धनगर यांनी या वेळी मार्गदर्शन केले. प्रकल्पग्रस्तांचे योग्य पुनर्वसन झाले नाही, अशी तक्रार बाबू धांगडा यांनी केली. डहाणू पंचायत समितीचे सदस्य रामदास सुतार हे प्रकल्पग्रस्तांपैकी असल्याने त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. रमण शनवार यांनी शासनाने दिलेली आश्‍वासने कशी पाळली नाहीत हे सांगितले. संघर्ष समितीचे उपाध्यक्ष लाल्या करबट यांनी त्यांच्या वंकास गावात पुनर्वसन झाले असल्याचे सांगितले. पुनर्वसित लोकांना पाटाचे पाणी देण्याचे आश्‍वासन दिले होते, मात्र चाळीस वर्षांत पाणी पोहोचले नसल्याचे ते म्हणाले. जयवंत ओझरे यांनी विस्थापित प्रकल्पपीडितांची शासनाने कशी अवस्था केली, दापचारीच्या जमिनीवरून बुलडोझर लावून झोपड्या पाडल्याची उदाहरणे दिली.

आमदार ऍड . चिंतामण वनगा प्रकल्पग्रस्तांच्या न्याय व हक्कासाठी दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले. अज्ञानामुळे प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन नीट होऊ शकले नाही, असे त्यांनी सांगितले. आमदार ओझरे यांनी प्रकल्पग्रस्त आदिवासींवर कसा अन्याय झाला याची अनेक उदाहरणे दिली. प्रकल्पग्रस्तांना शासनाने नोकरीत सामावून घेण्याचे आश्‍वासन दिले होते. केवळ एक टक्का प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या मिळाल्या, अशी खंत व्यक्त केली. प्रकल्पग्रस्त अशिक्षित असल्याने हक्कासाठी भांडू शकले नाहीत. यापुढे या प्रकरणी शासनाला जाब विचारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा ओझरे यांनी दिला. संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक पऱ्हाड यांनी आभार मानले.

Original at : http://www.esakal.com/esakal/20100608/5134245786642737004.htm 

1 comment:

  1. Save Dapchari | दापचारी प्रकल्पग्रस्तांची जमीन परत देण्याची मागणी

    ReplyDelete

Reach us at facebook