एकीकडे मुंबईतील जागांच्या किमती आकाशाला भिडलेल्या असताना, शहरातील मोक्याच्या जागांवरील गोठे कायम असून अशा प्रकारे तब्बल एक हजार 250 अनधिकृत गोठे आजघडीला मुंबई शहरात आहेत.
मुंबई- एकीकडे मुंबईतील जागांच्या किमती आकाशाला भिडलेल्या असताना, शहरातील मोक्याच्या जागांवरील गोठे कायम असून अशा प्रकारे तब्बल एक हजार 250 अनधिकृत गोठे आजघडीला मुंबई शहरात आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे त्याबाबत माहिती असूनही मुंबई महापालिकेने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही.
राज्य सरकारच्या एक जुलै 2006च्या एका आदेशानुसार मुंबईतील गुरांचे गोठे डहाणू तालुक्यातील दापचरी येथे हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या सर्व 31 जानेवारी 2007 पासून गोठ्यांच्या परवान्यांचे नूतनीकरणही बंद झाले आहे. मात्र त्यानंतर ‘बॉम्बे मिल्क प्रॉडक्शन असोसिएशन’ने या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र त्यांची याचिका न्यायालयाने फेटाळल्यानंतर 12 एप्रिल 2010 रोजी गुरे नियंत्रकांनी मुंबईतील सर्व गोठे मालकांना नोटिस पाठवून दापचरी येथे गोठे स्थलांतरित करण्याच्या सूचना केल्या. त्या वेळेच्या सव्र्हेनुसार शहरात 1,250 गोठे असून त्यात 31 हजार 588 गायी-म्हशी आहेत. त्या आधी 2007 केलेल्या पाहणीनुसार मुंबईमध्ये 1,537 गुरांचे गोठे होते आणि त्यात 39 हजार 551 गुरे होती. त्यानंतर तीन वर्षाच्या काळात गोठ्यांच्या मालकांकडून गुरे नियंत्रक विभागाने तसेच महापालिकेने नोंदणी शुल्क घेण्याचे बंद केल्याने 287 गोठे बंद झाले असल्याची माहिती हाती आली आहे. त्यामुळे एकूण सात हजार 973 गुरांची संख्या कमी झाली.
सध्या मुंबईतील गोठे मालकांकडून नूतनीकरण शुल्क घेतले जात नसल्याने हे सर्व गोठे अनधिकृतच असल्याचे गुरे नियंत्रक विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. हे गोठेमालक दापचरीला जाण्यासही तयार नाहीत. हे प्रकरण न्यायालयात असले तरी त्यावर कारवाईस स्थगिती नसल्याने महापालिका अधिनियम 394अन्वये कारवाई करू शकते. परंतु महापालिकेचे अधिकारी उदासीन असल्याचा आरोप त्यांनी केला. दुग्धविकास आयुक्त आर. डी. शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सध्या मुंबईत दुभत्या गायी-म्हशींनी आणण्यास बंदी घातली असल्याचे सांगितले. महापालिकेच्या जकात नाक्यावरच अशा गुरांना अडवले जाते, असा दावाही त्यांनी केला.
No comments:
Post a Comment